नंदुरबार : खरवड (ता. तळोदा) येथील बेपत्ता अल्पवयीन तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आधी अत्याचार; मग खून करून नंतर जाळले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. गुरुवारी ही घटना उघडकीस आली.
तळोदा तालुक्यातील खरवड येथील १३ वर्षीय अल्पवयीन तरुणीला १० रोजी अज्ञाताने फूस लावुन पळवून नेले होते. याबाबत पीडितेच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली होती. त्यानुसार शोध सुरु असताना १२ रोजी मोड शिवारात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आधी अत्याचार; मग खून करून नंतर जाळले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून, पोलिसांपुढे घटनेचा शोध लावण्याचे मोठे आव्हान आहे.
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याने मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. सुरक्षेबाबत जनजागृतीसह नराधमांना कायद्याचा धाक नसल्याचे स्पष्ट होत आहे. माणुसकीला काळिमा लावणारी घटना घडल्याने नागरिकांचे मने सुन्न झाली आहेत.