बेळगाव : कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. आतापर्यंत सामोर आलेल्या कलांनुसार काँग्रेसने ११५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा ७३ आणि जेडीएस २९ जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी मात्र, भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसला चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मतदारसंघ कुणाच्या पाठिशी उभे राहतात, यावर महाराष्ट्रात तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र सध्यातरी बेळगावमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. बेळगावमधील एकूण १८ जागांपैकी काँग्रेस १४ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा तीन जागांवर आघाडीवर आहे. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला सुरुवातीच्या कलांनुसार अपयश मिळाल्याचे दिसून येत आहे. सीमाभागातील मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रचारही केला होता. त्यासोबतच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भागामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या.
मतमोजणीत काँग्रेसने मोठी आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. फटाके ढोल वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. बहुमत न मिळाल्यास सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे.