कंपनीचा कर्मचारी आणि बॉस यांच्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याच्या रागातून कर्मचाऱ्याने चक्क बॉसला मारहाण केली. यासोबतच संतप्त कर्मचाऱ्याने कार्यालयाची तोडफोड करत बॉसचा आयफोनही फोडला. ही संपूर्ण घटना जुना मुंडवा रोड, चंदन नगर, पुणे येथील एका कंपनीत घडली. 1 डिसेंबर रोजी दुपारी कर्मचारी सत्यम शिंगवी यांचा राग त्याच्या बॉसवर फुटला. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रानुसार, अमोल शेषराव ढोबळे असे कंपनीच्या बॉसचे नाव आहे. ज्याचे वय 31 वर्षे आहे. तो खांदवे नगर, लोहेगाव, पुणे येथील रहिवासी आहे. अमोल शेषराव हे इंस्टा गो प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आहेत. कंपनीचे मालक अमोल यांनी बुधवारी चंदन नगर पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
पोलिसांनी, कर्मचारी सत्यम शिंगवी याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ५०४, ५०६ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, कंपनीच्या अनेक लोकांनी शिंगवीविरोधात तक्रारी केल्या आहेत. कंपनीतील लोकांशी त्याचे वागणे योग्य नाही. याबाबत तक्रारीत चिंता व्यक्त करण्यात आली.
शिंगवी यांच्याशी संपर्क साधून तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे कंपनीचे बॉस ढोबळे यांनी शिंगवीला कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकले. यामुळे संतापलेल्या शिंगवी यांनी कार्यालयातच बॉस ढोबळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी सांगितले की, कर्मचाऱ्याने बॉसला बांबूच्या काठीने मारहाण केली. कार्यालयात तोडफोडीसोबतच बॉसचा आयफोनही फोडण्यात आला. पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.