भुसावळ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर भावंडांचीही हत्या करण्यात आल्याचे प्रकरण राज्यात गाजले होते. रावेर तालुक्यातील बोरखेडा बु.॥ येथील हत्याकांडातील प्रमुख आरोपीने भुसावळ सत्र न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतला आहे तर सोमवार, 29 मे पासून नियमित सुनावणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी विशेष सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांनी सोमवारी तीन साक्षीदारांची न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनासमोर सरतपासणी केली.
भुसावळ न्यायालयात तीन साक्षीदारांची सरतपासणी
विशेष सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांनी सोमवारी दुपारी या हत्याकांडातील प्रमुख फिर्यादी, घटनास्थळाचे पंच, सर्कल अधिकारी या प्रमुख मुख्य तीन साक्षीदारांची न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे सरतपासणी घेतली. यावेळी प्रत्येक साक्षीदाराने घटनाक्रम सांगितला. अॅड.निकम यांनी सरकारी वकील अॅड.प्रवीण भोंबे यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, मंगळवारीदेखील तीन साक्षीदारांची तपासणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आरोपीचा जामीन अर्ज मागे
चौघा भावंडांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी महेंद्र सीताराम बारेला (रावेर तालुका) याच्या जामिनावर अॅड.एस.आर.पाल यांनी जामीन अर्ज दाखल केला होता मात्र सोमवारी त्यांनी तो मागे घेतला.