पटणा : बिहारमध्ये सध्या जातीनिहाय जनगणनेची जोरदार चर्चा सुरु होताच देशभरात या जनगणनेचे राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राजद अर्थात बिहारमधील सत्ताधारी आघाडीतील पक्षाचे माजी आमदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस यदुवंशकुमार यादव यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलं होत आहे. यामुळे या वादावरुन देशभरात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
यदुवंश कुमार यादव यांनी बिहारच्या सुपौल भागात पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर शनिवारी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, एकही ब्राह्मण या देशातला नाहीये. आपण या देशाचे मूळ निवासी आहोत. ब्राह्मण हे मूळचे रशियन आहेत. त्यांचं डीएनएचं टेस्टिंग झालं. एकही ब्राह्मण या देशाचा नाहीये. ते रशियातून इथे आले आणि आपल्याला एकमेकांमध्ये भांडायला लावून आपल्यावर राज्य करत आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे यांना रशियातून पळवून लावलं गेलं, तसंच त्यांना आता आपण इथूनही पळवून लावायला हवं, असं यदुवंशकुमार यादव म्हणाले.
#WATCH | "The DNA test shows no Brahmins belong to this country and are from Russia and now have settled here. Brahmins are trying to divide us and rule. We should chase them away from here," said RJD leader Yaduvansh Kumar Yadav in Bihar's Supaul yesterday pic.twitter.com/e2AOUPZTx1
— ANI (@ANI) May 2, 2023
दरम्यान, राजद नेत्याच्या या विधानानंतर आता त्यांचाच सत्तेतील मित्रपक्ष असणार्या संयुक्त जनता दलाकडून टीका करण्यात आली आहे. जदयुचे प्रवक्ते अभिषेक कुमार झा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राजदच्या नेत्यांनी केलेलं विधान वादग्रस्त आहे. परशुराम रशियातून आले होते की इतर कोणत्या देशातून? फक्त चर्चेत राहण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी अशी विधानं केली जात आहेत. राजदनं अशा नेत्यांविरोधात कारवाई करायला हवी, असं अभिषेक कुमार झा म्हणाले आहेत.