‘RBI’चा मोठा निर्णय! २ हजारांच्या नोटा वितरणातून काढल्या, ‘या’ तारखेपर्यंत बदलून घेता येणार

RBI announcement today : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. इथून पुढे २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. या नोट ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे आरबीआयने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना २ हजार रुपयांच्या नोटा देणं तातडीने थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत. ‘क्लिन नोट पॉलिसी’च्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करणार असल्याची घोषणा केलीये. मात्र, असे असले तरी २००० रुपयांची लगेचच बंद होणार नाही किंवा चलनातून बाद होणार नाही.

मात्र इतर बँकांना २००० हजारांची नोट ग्राहकांना देऊ नका, अशी सूचना करण्यात आलेली आहे. या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असणार आहे.

२३ मे पासून नोटा बदलता येतील
२३ मे २०२३ पासून तुम्ही बँकांमध्ये जाऊन २ हजारांच्या नोटा बदलून घेऊ शकता. परंतु एका वेळी केवळ २० हजार रुपयांच्या नोटाच अर्थात १० नोटाच तुम्हाला बदलता येतील.

२०१८-२०१९ मध्येच २ हजारांच्या नोटेची प्रिटिंग थांबविण्यात आली
दोन हजार रुपयांची नोट आरबीआय कायदा 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत आणण्यात आली. जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर चलनाच्या गरजेमुळे या नोटा चलनात आल्या. दुसऱ्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश फोल ठरला. त्यामुळे २०१८-२०१९ मध्ये २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.