भक्ष्याचा शोध; बिबट्या पडला विहिरीत, बाहेर काढण्यात वनविभागाला यश

तळोदा : भक्ष्य शोधताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना करडे येथील सिंगसपुर शिवारात शनिवार, १० रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. पाच ते सहा तासाच्या प्रयत्नानंतर विहिरीत जाळी सोडून या बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले.

तालुक्यातील करडे येथे विजयसिंह बावा भामरे यांच्या सिंगसपुर शिवारातील शेतात विहीर आहे. या विहिरीत शनिवार, १ ०  रोजी दुपारी दोनच्या सुमारास बिबट्या पडला. विजयसिंह भामरे हे शेतात कापूस पिकांची निंदणी करत असताना अचानक  आवाज आला. त्यामुळे त्यांनी आत डोकावून बघितले असता त्यांना बिबट्या 40 फूट खोल विहीरीत दिसुन आला.   त्यांनी लागलीच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. वनविभागाची टीम व मानद वन्यजीव संरक्षण टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. रात्रीचे अकरा वाजले होते दरम्यान पाऊस सुरू होता. शेतात चक्क काळोख पसरला होता. अशा वेळी सुरुवातीला खाटेच्या सहाय्याने बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु दोर तुटल्याने तो असफल झाला. नंतर बिबट्याला अडकविण्यासाठी लागणाऱ्या जाळीला विहीरीत फेकण्यात आले. त्याला पकडून बिबट्या बाहेर निघाला. दरम्यान मोठ्या शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर बिबट्याला विहिरीमधून बाहेर काढण्यात वनविभाग व वन्यजीव संस्थेला यश आले. यावेळी मेवासी वनविभाग तळोदाचे उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील, तळोदा वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, बोरद वनपाल अर्पणा लोहार, राजविहीर वनपाल वासुदेव माळी ई. अकरा कर्मचारी यांनी शर्तीचे प्रयत्न केले.

दरम्यान, रात्रीच्या वेळी भक्ष्य शोधण्यासाठी फिरणारा बिबट्याला विहिरीचा अंदाज न आल्याने तो  विहिरीत पडून गेला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.