ठाणे । कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला असून भाजप आमदाराने चक्क पोलीस ठाण्यात गोळीबार केला. भाजप आणि शिवसेना एकत्र सरकारमध्ये असताना आमदाराने पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या. धक्कादायक बाब म्हणजे उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडला आहे. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या गोळीबाराप्रकरणी गणपत गायकवाडांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, महेश गायकवाड यांच्यावरती झालेल्या गोळीबाराचा निषेध करत कल्याण पूर्व येथे दुकाने बंद करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून निषेध करण्याचे आव्हान केल्यानंतर ही दुकाने बंद ठेवण्यात आली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महेश गायकवाड यांच्या शिवसेना शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत आज पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयात पोहोचला. या वादादरम्यान आमदार गणपत गायकवाड व त्याचा सहकारी आणि शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचा सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते. यावेळी दोन्ही गटात वाद होऊन गोळीबार झाला.