भरधाव ट्रकची खासगी ट्रॅव्हल्सला जबर धडक, दोन गंभीर; जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : भरधाव ट्रकने खासगी ट्रॅव्हल्सला जबर धडक दिल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडलीय. यात दोन गंभीर असून अनेक प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सावदा येथील श्री साईबाबा मंदिराजवळ सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. एमएच ०७ एचबी ४९४४ या क्रमांकाच्या भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने जळगावकडे जाणार्‍या एमएच १६ क्यू ९९८६ या क्रमांच्या खासगी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. तर, लक्झरीच्या चालकासह एक गंभीर जखमी असून, अनेक प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अंकलेश्‍वर ते बर्‍हाणपूर रस्त्याची सध्या अतिशय दयनीय अवस्था झाली असून याच्या दुरूस्तीच्या मागणीसाठी अलीकडेच नागिरकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. याप्रसंगी तात्काळ रस्ता दुरूस्ती करण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले होते. तथापि, अद्यापही रस्त्याची दुरूस्ती सुरू करण्यात न आल्यामुळे अनेक अपघात होत असून आजचा अपघात देखील याच प्रकारातील असल्याने परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.