भुसावळातील हत्याकांडातील संशयिताच्या नावाने व्यापार्‍यांना धमकावले

भुसावळ : मै पाच मर्डर का आरोपी राजा मोघे बोल रहा हु, आपको दुकान चलाना है तो मुझे पैसे देना पडेगा, नही तो फायरींग हो जाऐगी म्हणत शहरातील हत्याकांडातील संशयिताच्या नावाने आलेल्या दोघांनी शहरातील व्यापार्‍यांना भरदिवसा धमकावल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी दिड ते दोनच्या सुमारास घडल्याने व्यापारी धास्तावले आहेत. या प्रकरणी तीन संशयितांविरोधात शहर व बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित राजा मोघे हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून मंगळवारी त्याच्यासह अन्य चार संशयितांना भुसावळात आणल्यानंतर हा प्रकार घडल्याने आता पोलिसांनी कसून चौकशीला सुरूवात केली आहे.

हस्तकांना पाठवून खंडणीची मागणी
शहरातील गोपी मॉलचे रवी झामनानी व गुजराथी स्वीटचे कपिल शर्मा यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी 1.20 ते दोन वाजेच्या सुमारास तोंडाला रूमाल बांधून आलेल्या दोन तरुणांनी मोबाईलवरून फोन लावून भाई बोल रहे म्हणत फोन दिला असता समोरील व्यक्तीने मै राजा मोघे बोल रहा हु, आपको दुकान चलाना है तो मुझे पैसे देना पडेगा. गुजराथी यांच्याकडे दहा हजार व झामनानी यांच्याकडे 20 हजारांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप व्यापार्‍यांनी केला आहे. गुजराथी यांनी पैसे नसल्याचे सांगून आलेल्या दोघा पंटरांना मी कोर्टात येत असल्याचे सांगितल्यानंतर संशयित निघून गेले.

व्यापार्‍यांनी केली कारवाईची मागणी
ही बाब मेहता यांनी शहरातील व्यापार्‍यांना सांगताच व्यापारी व माजी नगरसेवक निर्मल कोठारी, गुड्डू अग्रवाल, अजय नागराणी, शाम दरगड, रवी झामनानी, विशाल अग्रवाल, ब्रिजेश लाहोटी, विजय मोहनानी, देवा वाणी, संजय सुराणा, प्रसन्न पांडे आदी व्यापार्‍यांनी शहर पोलिसात धाव घेतली. यावेळी नव्याने रूजू झालेले सहायक पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. यावेळी जळगावचे आमदार सुरेश भोळे हे शहरात आल्यानंतर त्यांनीदेखील व्यापार्‍यांची भेट घेत पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना केल्या.

मोघे संशयित असल्यास पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार
व्यापार्‍यांच्या आरोपानुसार, दुकानात आलेल्या दोघा संशयितांनी फोनवर राजा मोघे बोलत असल्याची बतावणी केली मात्र हत्याकांडातील पाचही संशयितांना पोलीस वाहनातून न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पोलिसांचा न्यायालयात प्रचंड खडा पहारा होता यामुळे संशयित आरोपींच्या फोनवरून बोलणारा संशयित नेमका कोण ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना हा प्रकार घडला असल्यास बंदोबस्तावरील व न्यायालयात आणणार्‍या कैदी पार्टी पोलिसांच्या अडचणीत वाढ होईल यात शंकाच नाही मात्र तसे नसल्यास मोघे याच्या नावाने खंडणी मागणारा संशयित कोण? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.