भाजपचं ठरलं! आगामी विधानसभेत ‘एवढ्या’ जागा लढवणार? शिंदे-पवार गटाला किती जागा?

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. सत्तेत असलेल्या राज्यातील महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरून चांगलीच खणाखणी सुरू आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून दावे प्रतिदावे केले जात असतानाच भाजप महायुतीतून सर्वाधिक जागा लढवणार, असा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.

रविवारी रात्री भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होते. यावेळी तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानुसार आगामी विधानसभेत भाजप तब्बल 160 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

यापैकी 125 जागांवर त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 64 जागा मिळणार असल्याचं असल्याचं कळतंय. गेल्या निवडणुकीतही भाजपने 150 हून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यापैकी 105 जागांवर त्यांना विजय मिळाला होता. त्यामुळेच सध्या भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे.