भाजपचं ठरलं ! तीन राज्यातील मुख्यमंत्रिपदासाठी यांचं नावं निश्चित?

नवी दिल्ली । देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये पाच पैकी तीन राज्यांमध्येम्हणजेच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर आता भाजपा या तीनही राज्यांत मुख्यमंत्रिपदासाठी कुणाची निवड करतो, याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. यातच भाजपाच्या पक्षनेतृत्वाने तीन राज्यातील मुख्यमंत्रिपदासाठी नावं निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे.

यांची नावे निश्चित
भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुका विचारात घेऊन मुख्यमंत्र्यांची नावं निश्चित केली आहेत. तसेच पक्षश्रेष्ठींकडूनही या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तसेच ही नावं निश्चित करताना पक्षाचं भविष्यातील नेतृत्व विचारात घेऊन तीन राज्यांमध्ये उपमुख्यमंत्रीही नियुक्त केले जाणार आहेत. त्यानुसार मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्रिपदी कायम राहतील. मात्र भविष्यातील नेतृत्व तयार करण्यासाठी दोन उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात येऊ शकते.

त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री बनवलं जाईल. तसेच इथेही दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केले जातील. छत्तीसगडमध्ये रेणुका सिंह यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती होईल. तर पक्ष तिथे एखाद्या अनुभवी नेत्याला उपमुख्यमंत्रिपदी नियुक्त करेल.

मात्र याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. दुसरीकडे तेलंगणामध्ये काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी रेवंत रेड्डी यांचे नाव निश्चित केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्ण तयारी करण्यात आली असून ते ७ डिसेंबरला शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत काही मंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती आहे.