“शरद पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष राजकारणात आले तेव्हापासून एकाच पक्षात आहेत. त्यांची नाळ भाजपाशी जोडलेली आहे. त्यांनी कधीही पक्ष बदलला नाही, विचार बदलला नाही. काही लोकांनी राजकारणात आल्यापासून किती पक्ष बदलले आणि किती वेळा विचार बदलले हे मोजताही येणार नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी गुरुच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीनं पक्षनिष्ठ आणि प्रामाणिक माणसाबद्दल फार बोलू नये.” अशा शब्दात महाराष्ट्र भाजपने शरद पवारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
रविवारी शरद पवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, “२०१९ मध्ये भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने तिकिट सुद्धा दिले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर मी का भाष्य करु?” शरद पवारांच्या या विधानानंतर भाजपने शरद पवारांना त्यांच्या पक्षनिष्ठेची आठवण करुन दिली होती. त्यासोबत शरद पवारांना भाजपने आत्मपरिक्षण करण्याचा सल्लाही दिला.
आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्र भाजपने पुढे लिहिले आहे की, “ज्या काँग्रेसने तुम्हाला पक्ष विरोधी कारवायांसाठी पक्षातून काढले त्याच काँग्रेससोबत तुम्ही पुन्हा युती केली! ही कृती तुमच्या कोणत्या स्वाभिमानात बसते? पवार साहेब तुमच्या याच खोट्या आणि दलबदलू प्रवृत्तीमुळे तुमचा संपूर्ण पक्ष फुटला. जीवाभावाची माणसं सोडून गेली. ती का गेलीत? तुम्ही कधी आत्मपरीक्षण करणार आहात की नाही?” महाराष्ट्र भाजपच्या या पोस्टनंतर शरद पवार यांच्याकडून किंवा त्यांच्या गटाकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही.