भाजपसाठी दुखःद बातमी ; विद्यमान खासदाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई । देशासह महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून याच दरम्यान, भारतीय जनता पक्षासाठी एक दुखःद बातमी समोर आली आहे. हाथरस लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार राजवीर सिंग दिलर (६६) यांचे २४ एप्रिल रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने समर्थकांसह कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि तळागाळातील त्यांच्या कार्यासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे, त्यांच्या निधनाने पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मोदींनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

२०१९ मध्ये हाथरस लोकसभा मतदारसंघातून राजवीर सिंग दिलर विजयी झाले होते. मात्र यावेळी भारतीय जनता पक्षाने त्यांचे तिकीट रद्द केले आणि त्यांच्या जागी राज्य सरकारचे महसूल मंत्री अनुप वाल्मिकी यांना उमेदवारी दिली. दरम्यान, या मतदारसंघासाठी येत्या 7 मे ला मतदान होणार आहे. पण त्याआधीच राजवीर दिलेर यांच्या निधनामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दिलेर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.