जळगाव : भाजपची नवीन प्रदेश कार्यकारीणीची घोषणा बुधवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 47 जणांच्या कार्यकारणीतून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांना वगळण्यात आले असून त्यांच्या जागी प्रदेश चिटणीस म्हणून भुसावळचे माजी नगरसेवक अजय भोळेंची वर्णी लागली आहे. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून माजी आमदार स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, महिनाअखेरपर्यंत जिल्हाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया राबवण्यात येणार असून भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, पी.सी.पाटील, अमोल शिंदे यांच्यासह ज्ञानेश्वर महाराज-जळकेकर यांची नावे चर्चेत आहेत.
लेवा समाजाला प्रतिनिधीत्व
भाजपकडून ‘एक व्यक्ती एक पद’ हे धोरण अवलंबण्यात येत असून विद्यमान खासदार असलेल्या रक्षा खडसे यांच्याकडून पक्ष संघटनेचे पद काढून घेण्यात आले आहे. पक्षाच्या या जंबो कार्यकारीणीत जिल्ह्यातील दोन पदाधिकार्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात माजी आमदार स्मिता वाघ यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर भुसावळचे माजी नगरसेवक अजय भोळे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथराव खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर लेवा समाज पक्षापासून दुर जाण्याची भीती असल्यानेच भुसावळातील अजय भोळेंना पद देत पक्षाने लेवा समाजाला पक्षासोबत कायम ठेवण्याची रणनिती ठेवल्याची चर्चा आहे.