देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघातील आपल्या महायुतीचा उमेदवार सर्वात जास्त मतांनी विजयी होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय २०२४ अंतर्गत लोकसभा मतदार संघाची बांधणी सुरू आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर ४०० प्लस तर महाराष्ट्र राज्यात ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट केले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या ३३ मावळ लोकसभा मतदार संघातील आणि रायगड जिल्हयात येणाऱ्या पनवेल, उरण, कर्जत विधानसभा मतदार संघाचा कार्यक्रम पनवेल येथे संपन्न झाला.
यावेळी चौक सभेतून मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले कि, भाजप कार्यकर्त्यांच्या जीवावर जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे, आणि या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना अभिमान आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील किमान ४५ जागा जिंकायचा निश्चय आणि त्या अनुषंगाने प्रवास सुरु आहे. मी राज्यात अनेक ठिकाणी फिरत असताना लोकांशी संवाद साधला असता ९५ टक्क्यापेक्षा जास्त लोकांची पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे. प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकांशी चर्चा करतो त्यावेळी ते स्वतःहून मोदी यांनी केलेल्या कामाचे कौतुक व आभार व्यक्त करतात.
देशाच्या इतिहासात मोदी यांनी अनेक योजना राबवताना त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. काँग्रेसने ३७० कलम लागू करून काश्मीरचे तुकडे करण्याचा प्रयत्न केले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी ३७० कलम हटवले आणि काँग्रेसने केलेले पाप धुऊन काढले. आणि आता काश्मीरच्या लाल चौकात देशाचा तिरंगा ध्वज अभिमानाने फडकत आहे ते मोदी यांच्यामुळे. मुस्लिम महिलांना मुस्लिम महिला विवाह अधिकारांचे संरक्षण देण्याचे काम करत तिहेरी तलाकला गुन्हेगार ठरवणारा भारतीय संसदेचा कायदा मोदीजींनी केला. त्यामुळे मुस्लिम महिलांना न्याय देण्याचेही काम झाले. विरोधक अयोध्या मंदिराबाबत अनेक टिप्पण्णी करत राहिले पण मोदीजींनी प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारणी करून दाखवत विरोधकांची बोलती बंद करून टाकली.
महिला निवडणुकीत आरक्षण देत आता त्यांना प्राधान्य देण्याचे काम करण्यात आले ते सुद्धा मोदीजींच्या दृरदृष्टीतून देशाच्या महिलांना सक्षम करण्यासाठी उचलण्यात आलेले एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजप महायुतीला चिंता नाही त्यांच्याकडे अष्टपैलू देवेंद्र फडणवीस आहेत. हिंदुत्वाची कास सोडलेल्या उद्धव ठाकरेंना सोडून संस्कृतीची जाण असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी मोदींना साथ दिली आहे, असे सांगून भाजप महायुतीचा महाविजय होणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले कि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सबका साथ सबका विकास या अनुषंगाने प्रगती होत आहे. आपण कार्यकर्ते म्हणून भाग्यवान आहोतच. रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्प, रस्त्यांचे जाळे आणि त्या अनुषंगाने जिल्ह्याचा विकास होत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांना आपण येथून ५६ हजारांची आघाडी दिली तर विधानसभा निवडणुकीत ९३ हजारांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराचा भरघोस मतांनी विजय होण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने या लढाईत उतरावे, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
आजच्या रॅलीत मी १४२० लोकांना भेटलो. सर्वानी मोदीजींना आपला प्रतिसाद दिला. त्याचबरोबर मी विविध समाजातील लोकांची भेटही घेतली उत्तम वातावरण येथे आहे. मुस्लिम, ख्रिश्चन बांधव मला भेटले आमदार प्रशांत ठाकूर यांनी कब्रस्तानचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला असल्याचे सांगितले. आजच्या निमित्ताने पनवेलची ही ऊर्जा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली पाहिजे. – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे