भाजप हायकमांडची रात्री 3.20 पर्यंत महत्त्वपूर्ण बैठक, लोकसभेबाबत नेमकं काय-काय ठरलं?

नवी दिल्ली । आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून निवडणुकीच्या तारखा आता केव्हाही जाहीर होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून जोरदार तयारी सुरुअसून बैठकांच सत्र सुरु झालय. अशातच भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी रात्री 11 वाजेपासून ते पहाटच्या 3.20 पर्यंत बैठक पार पडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत 16 राज्यातील अनेक उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालय. भाजपाकडून आज उमेदवाराची पहिली यादी जाहीर होऊ शकते.

याबैठकींमध्ये विविध राज्यातील नेत्यांशी चर्चा करून प्रत्येक जागेवर चर्चा झाली. पहिली बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोन तास चालली. सायंकाळी ७ नंतर ही बैठक सुरू झाली. त्यानंतर भाजप मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीच्या (सीईसी) बैठकीत तब्बल ४ तास मॅरेथॉन विचारमंथन झाले.

या दोन्ही बैठकीत पहिली यादी अंतिम करण्यासाठी चर्चा झाली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कमान आपल्या हातात घेतली आहे. गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी पंतप्रधानांच्या निवासस्थानी दीर्घ बैठक घेतली. त्यानंतर ते भाजप मुख्यालयात पोहोचले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भूपेंद्र यादव आणि राज्यांचे नेते येथे उपस्थित होते. या निवडणुकीत पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देतो कि जुन्यांची पुनरावृत्ती करणार ? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याच्या चर्चा आहेत.

सर्वात आधी देशातील लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशच्या उमेदवारांबद्दल मंथन झालं. या बैठकीला यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यूपीनंतर पश्चिम बंगालच्या उमेदवारांबद्दल चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील सर्व 42 जागांबद्दल चर्चा झाली. त्यानंतर छत्तीसगडमधील लोकसभेच्या सर्व जागांवर चर्चा झाली. भाजपा आज छत्तीसगडमधील लोकसभेच्या चार जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करु शकते.

या राज्यात 40 टक्के उमेदवार बदलणार
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ़, तेलंगण, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, उत्तराखंड, आसाम, गोवा, दिल्ली आणि जम्मू कश्मीर या 16 राज्यातील लोकसभेच्या उमेदवारांबद्दल भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, आसाममध्ये 40 टक्के उमेदवार बदलले जाऊ शकतात. सर्बानंद सोनोवाल यांना डिब्रूगढमधून निवडणूक मैदानात उतरवलं जाऊ शकतं. डिब्रूगढमधून केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाहीय. भाजपा रामेश्वर तेली यांना राज्यसभेवर पाठवू शकतो. सिलचरमधून राजदीप रॉय यांच तिकीट कापलं जाईल.

अजून काय ठरलं?
सीईसीच्या बैठकीत तेलंगणच्या उमेदवारांबद्दल सुद्धा मंथन झालं. भाजपा तीन विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देऊ शकते. त्यानंतर पश्चिम बंगाल आणि केरळमधील सर्व जागांवर चर्चा झाली. यात 5 ते 6 उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते. राजस्थानच्या सर्व जागांबद्दल चर्चा झाली. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. जम्मू-काश्मीरबद्दल फक्त जम्मू रीजनच्या सीटबद्दल चर्चा झाली. प्रदेश अध्यक्ष रविंद्र रैना यांना निवडणुकीत उतरवलं जाऊ शकतं. राजौरी आणि अनंतनाग इथून रविंद्र रैना निवडणूक लढवू शकतात.