मुंबई : “जगन्नाथाच्या कृपेने भारताचा भाग्यरथ विकासाच्या दिशेने ओढला जातोय. मात्र भारताबाहेरीत काही आसुरी शक्तींना हे पाहावत नाहीये. त्यासाठी निरनिराळे विषय काढून भारतीयांमध्ये आपापसात भांडणं लावण्याचं काम सध्या त्यांच्याकडून सुरु आहे.”, असे सूचक विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी रविवारी नागपूर येथे केले.
ओडिशात जगन्नाथपुरी येथे सुरु असलेल्या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या चंद्रमणी नगर येथील श्री जगन्नाथ मंदिरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या आसुरी शक्तींबद्दल बोलताना सरसंघचालक म्हणाले की, “भारताचा होणारा विकास हा भारताबाहेरील काही लोकांना खुपत असून ते याबाबत राजकारण करत आहेत. केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी ते भारतीयांमध्ये आपापसात भांडणं लावत आहेत. कलियुगात एकजूटीने राहणे ही सर्वात श्रेष्ठ शक्ती असल्यामुळे भारतीयांची हीच एकजूट काहीजण तोडू पाहतायत.” अशा आसुरी शक्तींपासून सावध राहण्यासाठी त्यांनी भारतीयांना आवाहन केले आहे.
ते म्हणाले, “कलियुगात एकजूटीने राहणे ही सर्वश्रेष्ठ शक्ती असून सर्व भारतवासी एकजूटीने राहिल्यास जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी आपल्याला पराभूत करू शकेल. त्यामुळे अशा आसुरी शक्तींपासून प्रत्येकाला सावध राहणे गरजेचे आहे. त्याबाबतीत इतरांमध्येही जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. यानेच आपण संपूर्ण विश्वाला सुखी बनवू शकतो.”