आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत सलग पाच विजयांसह थाटात बाद फेरी गाठलेल्या भारतीय संघाची आज, सोमवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत कोरियाशी गाठ पडणार आहे. या लढतीतही गतविजेत्या भारताचेच पारडे मानले जात आहे. दुसऱ्या उपांत्य लढतीत पाकिस्तानसमोर चीनचे आव्हान असेल.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदकानंतर भारतीय पुरुष संघाने आपली लय आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही कायम राखली आहे. प्रत्येक सामना भारताने निर्विवाद वर्चस्व राखून जिंकला. आक्रमक, मध्यरक्षक आणि बचावपटू या सर्वांनीच आपली भूमिका चोख बजावली आहे. पेनल्टी कॉर्नरबरोबरच या स्पर्धेत भारतीयांकडून झालेले मैदानी गोल सर्वांत निर्णायक ठरले आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी हीच प्रमुख चिंता होती. मात्र, या वेळी सुखजीत सिंग, अभिषेक, उत्तम सिंग, गुरज्योत सिंग, अराईजीत सिंग हुंदाल या युवा खेळाडूंनी भारताचे हे वेगळेपण ठळकपणे समोर आणले.
राजकुमार पाल, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, निलकांत शर्मा या प्रत्येकाने मध्यरक्षक म्हणून चुणूक दाखवली आहे. आतापर्यंत केवळ चारच गोल भारताने स्वीकारले आहेत. एकूणच क्रिशन बहादूर पाठक आणि सूरज करकेरा या गोलरक्षक द्वयीने मिळालेल्या संधीचे सोने करून श्रीजेशची उणीव जाणवू दिलेली नाही. कर्णधार हरमनप्रीत सिंग आपली लय कायम ठेवून आहे. आतापर्यंत त्याने पेनल्टी कॉर्नरवर पाच गोल केले आहेत.
अर्थात, भारतीय खेळाडू कोरियाला कमी लेखण्याची चूक करणार नाहीत. कोरियन खेळाडूंचे वेगवान चाली रचण्याचे तंत्र लक्षात घेता त्यांना फार पेनल्टी कॉर्नर मिळणार नाहीत याची काळजी भारताला घ्यावी लागेल. कोरियाकडे जिहुन यांगसारखा यशस्वी ड्रॅग-फ्लिकर आहे. त्याने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक सात गोल केले आहेत.
● वेळ : दुपारी ३.३० वा.
● थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स