भारतात राहणारा प्रत्येकजण ‘हिंदू’ आहे, मोहन भागवत यांचे मोठे विधान

छत्तीसगड : देशात राहणारा प्रत्येकजण ‘हिंदू’ आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए समान आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. विविधतेत एकता हे भारताचे प्राचीन वैशिष्ट्य आहे. संपूर्ण जगात हिंदू धर्म ही एकमेव कल्पना आहे, जी सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर विश्वास ठेवते. तसेच, कोणीही धार्मिक विधी करण्याची पद्धत बदलण्याची गरज नाही, असेही भागवत म्हणाले.

छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूर येथील कार्यालयात स्वयंसेवकांच्या कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत बोलत होते. मोहन भागवत पुढे म्हणाले की, आरएसएसची स्थापना १९२५ साली झाल्यापासून मी ठामपणे सांगत आलो आहे की, भारतात राहणारा प्रत्येकजण हिंदू आहे. जे लोक भारताला आपली मातृभूमी मानतात आणि या विविधता असूनही एकतेच्या संस्कृतीवर विश्वास ठेवून एकत्र राहू इच्छितात, ते हिंदू आहेत. धर्म, संस्कृती, भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा विचारसरणी काहीही असो, सर्व हिंदूच आहेत, या दिशेने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.

भारतात विविधता असूनही आपण सर्व समान आहोत. आपले पूर्वज एकच आहेत. ४० हजार वर्षे जुन्या ‘अखंड भारत’चा भाग असलेल्या प्रत्येक भारतीयाचा डीएनए सारखाच आहे. आपल्या पूर्वजांनी शिकवले होते की प्रत्येकाने स्वतःच्या श्रद्धेवर आणि उपासनेच्या पद्धती सोडू नये आणि इतरांच्या श्रद्धा आणि उपासनेची पद्धत बदलण्याचा प्रयत्न करू नये, असंही भागवत यांनी म्हटलं आहे.

संघाच्या शाखेत कोणाची जात विचारली जात नाही
देशात पूर्वीच्या तुलनेत आता स्वयंसेवकांची संख्या वाढली आहे. देशभरात झपाट्याने वाढणारा हा संघ अतिशय अनोखा आहे. संघाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण संघाची तुलना कोणाशीही करू शकत नाही. जर आपल्याला संघाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला त्यात सामील व्हावे लागेल. जेव्हा आपण संघात सामील होऊ, तेव्हा संघाची महानता समजून येईल. संघाच्या शाखेत कोणाची जात विचारली जात नाही, असे मोहन भागवत म्हणाले.