भारतात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाची धुसफूस झाली सुरू, वाचा सविस्तर

ICC World Cup 2023 : ICC विश्वचषक ऑक्टोबरमध्ये भारतात होणार आहे. लवकरच या स्पर्धेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात येणार आहे. पण त्याआधी पाकिस्तानी सरकार आणि त्याच्या क्रिकेट बोर्डाचा डाव काही संपत नाहीये.

आयसीसी विश्वचषक 2023आधी पाकिस्तानचा धुसफूस सुरूच आहे. यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या सामन्यांच्या ठिकाणावर प्रश्न उपस्थित करत आहे, तर आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही विश्वचषकाबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव मुमताज बलोच यांनी सांगितले की, ते भारतात पाकिस्तानी संघाच्या सुरक्षेशी संबंधित बाबींचा आढावा घेत आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही भारताविरोधात वक्तव्ये केली आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- पाकिस्तानमध्ये क्रिकेट न खेळण्याचे भारताचे धोरण निराशाजनक आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२-१३ मध्ये झाली होती. त्यानंतर दोन्ही देश केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच आमनेसामने आले आहेत.

आयसीसी क्रिकेट विश्वचषकाबाबत बोलायचे झाले तर, यावर्षी भारतात होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी पाकिस्तानकडून विचित्र मागण्या केल्या जात आहेत. पीसीबीने आयसीसीकडे पाकिस्तानी संघाची दोन ठिकाणे बदलण्याची मागणी केली आहे.

यासोबतच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. पाकिस्तानी संघाने बिगर आशियाई संघासोबत सराव सामना खेळण्याची चर्चा केली आहे.