थायलंड : येथील मधील पटाया शहरात आयोजित करण्यात आलेल्या कुटुंब नियोजनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत, देशांच्या श्रेणीत, कुटुंब नियोजनात नेतृत्व एक्सेल (EXCELL) पुरस्कार-2022 पटकावणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. त्यामुळे आधुनिक कुटुंब नियोजन पद्धती जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी देशाकडून होत असलेल्या प्रयत्नांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे.
कुटुंब नियोजन सुधारण्याच्या भारताच्या उल्लेखनीय प्रयत्नांची प्रशंसा करताना, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आनंद व्यक्त केला आणि ट्विटमध्ये म्हटले:
भारताने @ICFP2022 द्वारे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा एक्सलन्स इन लीडरशिप इन फॅमिली प्लॅनिंग, एक्सेल (EXCELL) पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार म्हणजे योग्य माहिती आणि विश्वासार्ह सेवांवर आधारित दर्जेदार कुटुंब नियोजन पद्धतींच्या निवडी सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांना मिळालेली पोचपावती आहे.
आधुनिक गर्भनिरोधक पद्धती या सुलभ आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हाव्यात हे सरकारचे उद्दिष्ट असून यात सुधारणा होत असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वे(NFHS-5) च्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. या आकडेवारीनुसार आधुनिक पद्धतीचे गर्भनिरोधक वापरणारे 68% वापरकर्ते त्यांची साधने सार्वजनिक आरोग्य क्षेत्राकडून मिळवत असल्याचे दिसून आले आहे.