नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले. भारतानं त्यांच्या आरोपांचं खंडनही केलं. यानंतर दोन्ही देशांमघ्ये तणाव वाढलाय. भारत आणि कॅनडामधील वाढत्या राजनैतिक वादानंतर दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांना धक्का बसला आहे. कॅनडाची अर्थव्यवस्था भारत आणि भारतीयांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत दरवर्षी ३ लाख कोटी रुपयांचं योगदान देणाऱ्या भारतीयांच्या नाराजीचा तिथल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.
आधीच महिंद्रा समूह आणि जेएसडब्ल्यू स्टीलसारख्या बड्या कंपन्यांनी या प्रकरणी कॅनडाला आधीच मोठा धक्का दिला आहे. अशा परिस्थितीत टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस सारख्या बड्या आयटी कंपन्यांनीही जर कॅनडाला झटका देण्याचा निर्णय घेतला तर कॅनडाच्या अर्थव्यवस्थेचं काय होईल याची कल्पनाही करता येणार नाही.
कॅनडातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात भारतीयांचे वर्चस्व आहे. कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या २० लाख भारतीयांचा तेथील अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. कॅनडात शिकणारे फक्त साडेतीन लाख भारतीय विद्यार्थी तिथल्या अर्थव्यवस्थेत ४.९ अब्ज डॉलर्सचे योगदान देतात. एवढंच नाही तर कॅनडातील मालमत्तेत भारतीयांची सर्वाधिक गुंतवणूक आहे. व्हँकुव्हर, ग्रेटर टोरंटो, ब्रॅम्प्टन, मिसिसॉगा आणि ब्रिटिश कोलंबिया, ओंटारियो येथे भारतीय दरवर्षी ५० हजार कोटींहून अधिक गुंतवणूक करतात.
भारतीय आयटी कंपनी इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रोनं कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यासोबतच तिथल्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळत आहेत. भारतातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसनं टोरंटो, कॅलगरी आणि कॅनडातील व्हँकुव्हर येथे आपली सेंटर्स सुरू केली आहेत. दुसरीकडे भारतीय आयटी कंपनी टीसीएस आणि विप्रोचाही कॅनडात मोठा व्यवसाय आहे. अशात जर भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला आणि कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला, तर कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका लागू शकतो.