भारतीय नागरिकांनो, लक्ष द्या! ‘या’ भागात जाणं टाळा, केंद्र सरकारने जाहीर केली अ‍ॅडव्हायझरी

नवी दिल्ली : भारत आणि कॅनडामधील तणावादरम्यान खलिस्तानी संघटनेने शिख फॉर जस्टिनने हिंदू समुदायाच्या लोकांना कॅनडा सोडण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी केंद्र सरकारने अ‍ॅडव्हायझरी जारी केली असून, भारतीय नागरिकांनी तुम्हाला ज्या भागात लक्ष्य केले जाऊ शकते, अश्या भागात जाणं टाळा, असे सांगण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरी म्हटले आहे की, भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणाऱ्या कॅनडातील राजदूत आणि भारतीय समुदायाच्या लोकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भारतीय लोकांनी अशा घटना घडलेल्या ठिकाणी जाणे टाळावे.

कॅनडामधील आमची उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावास कार्यालये भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी त्यांच्या संपर्कात राहतील. ‘अलीकडेच भारतीय राजदूत आणि भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणाऱ्या भारतीय समुदायाच्या एका वर्गाला धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे भारतीय वंशाच्या लोकांनी अशा घटना घडलेल्या किंवा अशा घटना घडण्याची शक्यता असलेल्या भागात जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळे कॅनडामध्ये राहणारे भारतीय वंशाचे विद्यार्थीही घाबरले आहेत. कॅनडात एकूण 2 लाख 30 हजार भारतीय विद्यार्थी राहतात आणि 7 लाख अनिवासी भारतीय आहेत.