भारतीय लष्कर : गणवेशाचा अनधिकृत प्रसार रोखण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी…

तरुण भारत लाईव्ह I भारतीय लष्कराने त्यांच्या नव्याने तयार  केलेल्या कॅमोफ्लाज पॅटर्न गणवेशाच्या  डिझाइन आणि  कॅमोफ्लाज पॅटर्नचे बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) प्राप्त केले आहेत. लष्करप्रमुखांनी  सुधारित लढाऊ गणवेशाचे अनावरण लष्कर दिन  2022 दरम्यान  केले होते. डिझाईनचा स्वामित्व अधिकार 10 वर्षांसाठी भारतीय लष्कराकडे आहे आणि तो आणखी पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो. अनधिकृत विक्रेत्यांना खुल्या बाजारात अशा पद्धतीच्या ड्रेसचे उत्पादन आणि विक्री करण्यापासून रोखण्यासाठी  हे पाऊल  आहे कारण  यामुळे या  भारतीय लष्कर आणि संपूर्ण देशाला सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

यासंदर्भातील आदेशानुसार,या गणवेशाची विक्री केवळ  भारतीय लष्कराच्या युनिट रन कॅन्टीनमध्ये केली जाईल. बौद्धिक संपदा अधिकारामुळे , भारतीय लष्कराकडे आता डिझाइनचे विशेष अधिकार आहेत आणि  कोणत्याही डिझाइन अधिकाराचे  उल्लंघन आणि या डिझाइनच्या अनधिकृत उत्पादनाविरोधात भारतीय लष्कर कायदेशीर खटला दाखल करू शकते.

नागरी प्रशासन आणि पोलिसांच्या सहकार्याने, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयाने  त्यांच्या दायित्व क्षेत्रांतर्गत सर्व राज्यांमधील सर्व विक्रेत्यां पर्यंत ही  माहिती सक्रियपणे प्रसारित केली आहे.