भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीपूर्वी मोठा धक्का, ज्याची भीती होती तेच झालं…

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त हॉकीचे प्रदर्शन करून भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीचा सामना 6 ऑगस्ट रोजी जर्मनीशी होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. कारण  उपांत्य फेरीत सर्वात अनुभवी बचावपटू अमित रोहिदासशिवाय खेळावे लागणार आहे.

अमित रोहिदासवर 1 सामन्याची बंदी
ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय बचावपटू अमित रोहिदासला लाल कार्ड दाखवण्यात आले. सामन्यादरम्यान त्याची हॉकी स्टिक ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूच्या चेहऱ्यावर लागली, ज्यामुळे त्याला लाल कार्ड मिळाले. लाल कार्ड मिळाल्यानंतर अमित रोहिदास त्या संपूर्ण सामन्यातून बाहेर राहिला. आता तो उपांत्य फेरीच्या सामन्यातही खेळणार नाही.

एफआयएचने निवेदन जारी करून काय म्हटले ?
आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे, असे एफआयएचने एक निवेदन जारी केले. तो सामना क्रमांक 35 मध्ये म्हणजेच भारत आणि जर्मनी यांच्यातील उपांत्य फेरीत खेळणार नाही.

अमित रोहिदासला रेड कार्ड कधी मिळाले ?
भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातील सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाले. शॉट खेळत असताना त्याची हॉकी स्टिक ग्रेट ब्रिटनचा खेळाडू विल कॅलननच्या चेहऱ्यावर लागली. मात्र, मैदानावरील रेफरीला काही गंभीर वाटले नाही. पण, ब्रिटिश खेळाडूंनी पुन्हा व्हिडिओ रेफरल घेतला, त्यानंतर अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाले.

भारताने उपांत्यपूर्व फेरीतील ग्रेट ब्रिटनविरुद्धचा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा जिंकला. तत्पूर्वी, दोघांमधील सामना चारही क्वार्टरमध्ये 1-1 असा बरोबरीत सुटला.