भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका आतापर्यंत अप्रतिम झाली आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या वनडेत श्रीलंकेने टीम इंडियाचा पराभव केला. पहिला वनडे सामना बरोबरीत, अर्थात टाय झाला. आता या एकदिवसीय मालिकेबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना टाय झाला तर त्यात सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. आता प्रश्न असा आहे की, पहिला एकदिवसीय सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर का घेण्यात आली नाही ? दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने धक्कादायक विधान केले आहे. ज्यात तो म्हणाला की पहिल्या वनडे सामन्यातही सुपर ओव्हर व्हायला हवी होती, पण तसे झाले नाही.
पहिल्या वनडेत काय घडलं?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 230 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात टीम इंडिया केवळ 230 धावा करू शकली आणि सामना बरोबरीत थांबला. मोठी गोष्ट म्हणजे आयसीसीच्या नियमांनुसार सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर व्हायला हवी होती, पण आयसीसी मॅच रेफरी रंजन मदुगले यांनी तसे केले नाही. एवढेच नाही तर मैदानावरील पंच आणि थर्ड-फोर्थ अंपायरवरही प्रश्न उपस्थित होत आहे. एकदिवसीय सामन्यातील सुपर ओव्हरचा नियम या अधिकाऱ्यांनाही माहीत नव्हता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ODI मध्ये सामना टाय झाल्यास ICC चा नियम काय ?
आयसीसीच्या नियमांनुसार दोन्ही संघांनी समान धावसंख्या बनवली तर सुपर ओव्हर व्हायला हवी. जर सुपर ओव्हर देखील टाय राहिली तर सुपर ओव्हर विजेते मिळेपर्यंत चालू ठेवावी. एकदिवसीय सामना टाय झाला तरी सुपर ओव्हर असावी असे आयसीसीच्या नियमात स्पष्टपणे लिहिले आहे पण कोलंबोमध्ये असे झाले नाही. त्यामुळे टीम इंडियाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान सहन करावे लागले आहे. टीम इंडियाला पहिला टी-२० सुपर ओव्हरमध्ये जिंकता आला असता आणि तसे झाले असते तर आज ती मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडली नसती. आता या मोठ्या चुकीवर आयसीसी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.