बुलढाणा । बुलढाणामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. इंदूरहून अकोल्याकडे येणाऱ्या खाजगी प्रवाशी बस जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात कोसळली असून या दुर्घटनेत २८ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व प्रवासींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, इंदोर येथील रॉयल ट्रॅव्हल्सच्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. बुलढाण्यामधील जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात खासगी बस १०० फुट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. सकाळी बस इंदोर येथून अकोलाकडे जात असताना साडे पाच वाजता हा अपघात झाला.
जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने मदत कार्य उशिरा सुरू झाले. घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातातील अपघातात २८ जण जखमी झाले असून, सर्व खमींवर दर्यापूर (मध्यप्रदेश ) व बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.