भीषण दुर्घटना ! पिकअप व्हॅन दरीत कोसळल्याने 14 जण जागीच ठार, 21 जखमी

मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.  पिकअप व्हॅन उलटल्याने 14 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व लोक शाहपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील अमाही देवरी गावातून मसुरघुगरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गावात सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परतत असताना बुधवारी रात्री दिंडोरी जिल्ह्यातील बडझर घाटात अचानक पिकअपचा ब्रेक फेल झाला. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले काही क्षणातच पिकअप २० फूट खोल दरीत जाऊन उलटला.

हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी आरडाओरड झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्याशिवाय स्थानिकांनीही तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.