पनवेल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज पनवेलला भाषण झाले. या भाषणात त्यांनी भाजपाच्या आमदार फोडीच्या राजकारणावर टीका केली. तसेच, अजित पवार यांना भाजपाने घाबरवून सरकारमध्ये सामील करून घेतल्याची अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली. याच वेळी त्यांनी छगन भुजबळांच्या तुरुंगावासाच्या मुद्द्यावरून टोला लगावला.
तुम्ही सरकारमध्ये का सामील झालात, या प्रश्नावर काही जण सांगतात की त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. ते लोकं खोटं बोलतात. खरं कारण असं असेल की, पंतप्रधानांनी तिकडे भाषणात ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची गोष्ट काढली, तेव्हा लगेच सगळे सत्तेत सहभागी झाले. कारण भुजबळांनी सांगितलेलं असणार की जेलच्या आतमध्ये काय काय असते. ते म्हणाले असतील की आपण इथे जाऊ पण तिथे (जेलमध्ये) नको, अशा खोचक टोला राज यांनी अजित पवार आणि इतर राष्ट्रवादीच्या आमदारांना लगावला.
आज मी तुम्हाला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी आलो आहे. चंद्रयान जे चंद्रावर गेलेय, त्याचा काय उपयोग? तिथे जाऊन खड्डेच पहायचेत, ते महाराष्ट्रात सोडले असते खर्च तरी वाचला असता. हा काही मुंबई गोवा महामार्गाचाच भाग नाहीय. नाशिकच्या रस्त्याचीही तिच अवस्था आहे. हे खड्डे काही आज नाही पडलेत. २००७ साली या रस्त्याचे काम सुरु झाले. काँग्रेसचे सरकार गेले शिवसेना भाजपाचे सरकार आले त्यानंतर कोणा कोणाचे सरकार आले. या खड्ड्यांतून जात असताना त्याच त्याच पक्षातील लोकांना कसे मतदान करता याचे आश्चर्य वाटतेय,” असा सवाल राज यांनी मतदारांना विचारला.