Mahrashtra Politics : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात जात सत्तेत सामील झाले. अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ या तीन नेत्यांनीही शरद पवार यांची साथ सोडली. दरम्यान, युती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर या नेत्यांच्या वक्तव्यांची जोरदार चर्चा होत आहे. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ ?
मंत्रिपद माझ्यासाठी नवीन नाहीये. 1991 पासून अनेक वेळा सरकारमध्ये मंत्री राहिलेलो आहे. 1991 ला मी महसूल मंत्री झालो. तेव्हापासून अनेकदा सरकारचा भाग म्हणून काम केलं. सरकारमधून बाहेर राहिलो. अनेकदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे मंत्रिपदाचं मला काही फार अप्रूप नाही, असं भुजबळ म्हणाले आहेत. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
अलीकडच्या काळात ज्या काही घटना घडल्या आहेत. अगदी 2014 पासून ते काल परवापर्यंतच्या सगळ्या घटनांचा उहापोह मुंबईच्या सभेत अजितदादा पवार यांच्यासह सगळ्यांनी केली आहे. त्यामुळे मी त्यावर अधिक बोलणार नाही, असं भुजबळ म्हणाले.
शरद पवारांना थोडं विस्मरण झालेलं आहे. मला जुन्नर, एरंडोल, येवला इथे सुद्घा मागणी होती. त्याच वेळी येवल्याचे सर्व सरपंच, स्थानिक नेते सातत्याने रामटेक बंगल्यावर येत होते. त्यांनी सांगितलं आहे की, येवला तालुका मागास आहे.विकासासाठी तुमची आम्हाला आवश्यकता आहे. मग मी पवार साहेबांना सांगितले की, मला येवल्यात काम करण्याची संधी आहे. पुढे मग येवला मतदारसंघातून मी चारदा निवडून आलो, असंही भुजबळांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादी पक्षात येणारा मी पहिला नेता आहे. त्यामुळे स्वाभाविकच माझ्या मतदारसंघात त्यांची सभा झाली. हा माझा अधिकार आहे, असंही भुजबळांनी सांगितलं आहे.