भुसावळ : भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेर येथे बदली झाल्यानंतर धर्माबाद, जि.नांदेड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक विक्रांत हिंमत गायकवाड यांची नियुक्ती गृह विभागाने मंगळवारी केली होती. बदली होताच गायकवाड हे पदभार घेण्यासाठी बुधवारी जळगावकडे निघाले मात्र भुसावळनजीक आल्यानंतर त्यांना पदभार न घेण्याचा संदेश मिळाल्यानंतर आल्या पावली ते माघारी परतले. गृह विभागाचे अवर सचिव स्वप्नील गोपाल बोरसे यांनी बुधवारी पुन्हा नवीन काढलेल्या आदेशानुसार भुसावळसाठी वर्धा पोलीस उपअधीक्षक कृष्णात महादेव पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी ते पदभार स्वीकारणार आहे. गृह विभागातील बदलीच्या सावळा-गोंधळाने पोलीस अधिकार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 24 तासातच गृह विभागाने आदेश फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत असून या निर्णयाविरोधात काही अधिकारी मॅटमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.
खडसे म्हणाले ; अधिकार्यांच्या बदल्या लिलाव पद्धत्तीने
राज्यातील अनेक अधिकार्यांच्या फेरबदल्या झाल्यानंतर या प्रकाराविषयी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलताना मोठा आरोप केला आहे. पोलीस अधिकार्यांच्या बदल्या लिलाव पद्धत्तीने झाल्या असून जे अधिकारी राजकारण्यांचे जवळचे नसतील त्यांना बदलण्यात आले आहे. गृह विभागाला बदल्याच करायच्या होत्या तरआधी पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यायला हवा होता, असे खडसे म्हणाले आहे.
भुसावळात आज पिंगळे रूजू होणार
भुसावळचे उपअधीक्षक वाघचौरे यांची संगमनेरला बदली झाल्यानंतर ते बुधवारी आपला पदभार सोडणार असून वर्धा पोलीस उपअधीक्षक कृष्णात महादेव पिंगळे हे बुधवारी सकाळी पदभार घेण्याची शक्यता आहे. भुसावळसाठी नियुक्त मात्र सुधारीत आदेशानुसार जालना उपअधीक्षकपदी बदली झालेले विक्रांत गायकवाड यांच्या भूमिकेविषयी आता लक्ष लागले आहे. आधीच बदल्यांना झालेला विलंब त्यातही 24 तासात बदलीचे आदेश फिरवल्याने आल्याने गृह विभागावर टिकेची झोड उठली असून अधिकार्यांच्या गोटातही मोठी खळबळ उडाली आहे.