भुसावळत बोगस शिक्षक भरती प्रकरणात प्राचार्यांसह संस्था चालकांच्या अडचणीत वाढ : न्यायालयाने फेटाळला पाच संशयितांचा अटकपूर्व जामीन

भुसावळ : बोगस शिक्षक भरती प.क.कोटेचा महाविद्यालयातील प्राचार्यांसह पाच संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने संंबंधिताच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे कार्यरत असताना कोटेचा महिला महाविद्यालयात कार्यरत असल्याचे दाखवून शिक्षकांनी शासनाचा 10 लाख 54 हजार 630 रुपयांचा पगार लाटल्याचा तसेच खोटी बिले व कागदपत्रे, ठराव करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जयश्री न्याती यांच्या तक्रार अर्जावरून सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल आहे.

जामीन फेटाळल्याने खळबळ
फसवणूक प्रकरणी 7 सप्टेंबर 2023 रोजी अतिरीक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीनुसार, संस्थाध्यक्षा पद्माबाई मोतीलाल कोटेचा, संस्थेचे सचिव संजय सुरेशचंद्र सुराणा, प्रा.डॉ.मंगला साबद्रा, उपप्राचार्य जनार्दन विश्वनाथ धनवीज, शिक्षक रुकसाना बी.ताजमल हुसेन या पाच जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीशांशी फेटाळल्याने संबंधितांच्या अडचणी वाढल्या आहेत.

40 लाखांची रक्कम गेली कुठे ?
फसवणूक प्रकरणातील शिक्षिकेने कोटेचा सोसायटीतून तब्बल 40 लाखांचे कर्ज काढले व कर्जापोटी खात्यात जमा झालेली रक्कम बेरर चेकद्वारे काढण्यात आल्याची माहिती आहे मात्र खात्यातील रक्कम नेमकी घेतली कुणी? बेरर चेकमागे स्वाक्षर्‍या करणारे लोक कोण? याचा पोलिसांनी तपास करावा तसेच सखोल जाब-जवाब नोंदवल्यास अनेक बाबी समोर येणार आहेत. दरम्यान, अर्जदार जयश्री न्याती यांच्यातर्फे जामीन अर्जावर हरकत नोंदवण्यात आली होती. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.मोहन देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. भुसावळ शहर पोलीस निरीक्षक गजानन पडघण म्हणाले की, या प्रकरणातील सर्व दोषींना लवकरच अटक करण्यात येणार आहे.