मुंबई । अमृत योजनेतून भुसावळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या तांत्रिक बाबी तपासल्या जाव्यात. या योजनेतून पाणी पुरवठा लवकर सुरू होण्यासाठी योजनेच्या कामांना गती द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आमदार संजय सावकारे यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस आमदार संजय सावकारे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीस जिल्हाधिकारी जळगाव दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पाणी पुरवठा योजनाची कामे वेगाने पूर्ण होणे महत्वाचे आहे. यासाठी संबधित यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी. भुसावळ शहराला पाणी पुरवठा योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी जळगाव यांनी बैठकीचे आयोजन करून याबाबत आढावा घ्यावा. बैठकीत वरणगाव पाणी पुरवठा योजनेबाबातही चर्चा करण्यात आली. संबधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
जळगाव महानगरपालिका व वरणगाव नगरपंचायत क्षेत्रातील सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्पाबाबत महाजनकोसमवेत तातडीने सामंजस्य करार करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र विद्युत निर्मिती केंद्रातील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबतही चर्चा यावेळी करण्यात आली