भुसावळ : शहरातील दोन व्यापार्यांना धमकावून खंडणी मागणार्या एकाच्या जळगावातून मुसक्या आवळण्यात आल्यानंतर दुसर्या आरोपीच्या शहरातून मुसक्या बांधण्यात यंत्रणेला यश आले. रीतीक उर्फ गोलू भगवान निदाने (22, नॉर्थ कॉलनी, भुसावळ) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, संशयित योगेश उर्फ सोनू हिरालाल मोघे (28, रा. आगवाली चाळ, ह.मु. हिरावाडी, नाशिक) यास यापूर्वीच जळगावातून गुन्हे शाखेने अटक केल्याने या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता दोन झाली असून अन्य एका पसार आरोपीचा शोध सुरू आहे. खंडणी प्रकरणात व्यापार्यांना फोनवरून धमकावणारा संशयित खरात हत्याकांडातील संशयित राजा मोघेच असल्याची बाब तपासात समोर आली आहे.
दोघा आरोपींना पोलीस कोठडी
रीतीक उर्फ गोलू भगवान निदाने (22, नॉर्थ कॉलनी, भुसावळ) व सोनू हिरालाला मोघे यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 20 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पघडण यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार मोहंमद अली सय्यद, सोपान पाटील, भूषण चौधरी यांनी नॉर्थ कॉलनीतून संशयित रीतीक निदानेच्या मुसक्या बांधल्या.