भुसावळ : गणेश वाघ : लग्नासाठी मुलगी पसंत नसतानाही केवळ आईने प्राण त्यागण्याची धमकी देत आग्रह धरल्याने त्याने लग्नास होकार दिला खरा मात्र त्याच्या मनातील घालमेल थांबत नव्हती… डिसेंबर 2022 मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर त्याने पत्नीला भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील शगुन इस्टेटमधील भाड्याच्या घरात आणले मात्र दोघांमधील दुरावा कमी होण्याऐवजी अधिकच वाढला. दररोजच खटके उडू लागल्याने आराध्या माहेरी निघून गेली मात्र मुलाची नातेवाईकांमध्ये सामाजिक बदनामी नको म्हणून सुशीलादेवी यांनी मुलाचे मन वळवत नववधू असलेल्या सुनेला बुधवार, 10 मे रोजी भुसावळात आणले. पंधरा दिवसात गाडी रूळावर येईल या आशेने त्यादेखील मुलाकडे थांबल्या मात्र ‘पत्नी आयुष्यात नकोच’ ही खूनगाठ बांधलेल्या हेमंतने रेल्वेतील धारदार ब्रेक कीने आधी मध्यस्थीसाठी आलेल्या शालकावर हल्ला केला मात्र जीव वाचवून तो पळाल्याने त्याचे प्राण वाचले तर पत्नीचा जीव जाईपर्यंत त्याने लोखंडी तवा व रेल्वेतील ब्रेक किने हल्ला सुरूच ठेवला व नंतर आईनेदेखील हा प्रकार पाहून ‘मी जिवंत राहून काय करू’ म्हटल्यानंतर क्षणाची पर्वा न करता आरोपीने जन्मदात्या आईलाच संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली.
इच्छेविरोधातील लग्नामुळे दोघांचे गेले प्राण
बिहारच्या पटना भागातील रहिवासी असलेला हेमंत भूषण हा भुसावळ रेल्वेच्या सीअॅण्डडब्ल्यू विभागात वर्षभरापूर्वीच रूजू झाला आहे. वांजोळा रोडवरील शगुन इस्टेटमधील कल्पना अविनाश नेमाडे यांच्या दुसर्या मजल्यावरील टू बीएचके प्लॅटमध्ये तो ऑक्टोंबर 2022 पासून भाडे तत्वावर वास्तव्यास आहे. लग्नाचे वय झाल्याने व एकटा राहून मेसचे जेवण करून हाल होण्यापेक्षा दोनाचे चार व्हावेत या हेतूने आई सुशीलादेवी यांनी मुलासाठी मुलगी शोधणे सुरू केले. आराध्याचे स्थळ समोर आल्यानंतर हेमंतला मुलगी दाखवण्यात आली मात्र हेमंतने लग्न करण्याची इच्छा नसल्याचे सांगून स्थळास नकार दिला मात्र आईने लग्न करण्यासाठी गळ घातली शिवाय लग्न न केल्यास प्रसंगी जीवाचे बरे-वाईट करण्याची धमकी दिल्याने डिसेंबर 2022 मध्ये हेमंत व आराध्या विवाहबद्ध झाले.
हुंड्यासह वस्तूंना लावला नाही हात
वधू पक्षाकडून रेल्वेतील नोकरीत असलेल्या जावयाला तब्बल 18 लाखांचा हुंडा देण्यात आला तसेच कॉटसह अन्य महागड्या संसारोपयोगी वस्तूही पुरवण्यात आल्या मात्र आराध्या पसंत नसल्याने आरोपी हेमंतने हुंड्याच्या एक रुपयालाही हात लावला नाही तसेच लग्नात मिळालेल्या वस्तूदेखील आपल्या मूळ गावीच ठेवल्या.
विवाहिता पतीकडे आली अन जिवाला मुकली
संशयित हेमंतशी दररोज होणार्या वादातून पत्नी आराध्या या सुमारे दोन महिन्यांपूर्वीच बिहार राज्यातील मूळ गावी माहेरी निघून गेल्या होती. ही बाब सुशीलादेवी यांना कळाल्यानंतर त्यांनी मुलाच्या संसाराची माती होवू नये व संसाराची गाडी रूळावर यावी म्हणून आराध्याची मनधरणी करीत तिची समजूत काढली व दोन्ही सासू-सुना बुधवार, 10 मे रोजी भुसावळात दाखल झाल्या. सुरूवातीचा आठवडा चांगला गेला मात्र दाम्पत्यातील कुरबूर थांबत नसल्याने सुशीलादेवी यांनी मुक्काम वाढवला व बुधवार, 24 मे रोजी त्या मूळ गावी परतणारदेखील होत्या मात्र त्यापूर्वी त्यांच्यासह सूनेचा निर्घृण खून झाला.
खुनासाठी तीन दिवसांपूर्वी आणली ‘ब्रेक की’
आरोपी हेमंत याने पत्नीला संपवण्याची मनाशी खुणगाठ बांधली होती व कुठल्याही परीस्थितीत आपल्या आयुष्यात पत्नी नकोच म्हणून तो अस्वस्थदेखील होता. सीअॅण्डडब्यू विभागातून त्याने ब्रेक किला धारदार करून आणत घरात लपवून ठेवले होते. सोमवारी आरोपी हेमंतचा मुंबईस्थित शालक ऋषभ गुप्ता (35) हादेखील मेहुण्याला वादावर पांघरूण टाकावेत म्हणून समजावण्यासाठी आला होता मात्र आरोपीच्या डोक्यातील सैतान जागा झाल्याने मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास आरोपीने आपल्या शालकाच्या डोक्यावर व हातावर ब्रेक किने हल्ला चढवल्याने तो रक्तबंबाळ होवून आरडा-ओरड करू लागताच आरोपीने नंतर पत्नीवर ब्रेक किचे नऊ वार केले तसेच लोखंडी तव्याने पत्नी गतप्राण होईपर्यंत हल्ला सुरूच ठेवला. त्यानंतर आईला घडल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर तिलादेखील सुनेचा मृत्यू झाल्याचे पाहून धक्का बसला व मी देखील जगून काय करू ? मलादेखील मारून टाक, असे आरोपीने सांगताच आरोपीने आईवरच लोखंडी तवा व ब्रेक किने सातवेळा हल्ला चढवून तिलादेखील ठार मारले.
अशी उघडकीस आली खुनाची घटना
मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दुहेरी हत्याकांडातून बचावलेला संशयित ऋषभ गुप्ता (35) हा रक्तबंबाळ अवस्थेत फ्लॅटबाहेर पडला व त्याने ही बाब सुरक्षा रक्षक मोरे यांना सांगितली तसेच पोलिसांची मदत मागण्यासाठी तो वांजोळा रस्त्यापर्यंत चालत आला व त्याने एका रीक्षा चालकाकडे मदत मागितल्यानंतर सुज्ञ रीक्षा चालकाने घडलेला सर्व प्रकार समजून घेत बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवली. जखमी अवस्थेतील ऋषभवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलीस अधिकार्यांची धाव
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये व बाजारपेठ कर्मचार्यांनी धाव घेत पंचनामा करत मृतदेह ट्रामा सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी हलवले. आरोपी हेमंत भूषण विरोधात बाजारपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.