भुसावळ : पूर्व वैमनस्यातून भुसावळ तालुक्यातील खडका गावातील रहिवासी व रीपाइं युवा जिल्हाध्यक्ष गिरीश देविदास तायडे यांच्यावर संशयित जितेंद्र खंडारे याने चाकूचे वार करीत प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना बुधवार, 7 जून रोजी रात्री पावणेदहा वाजता खडका एमआयडीसी परीसरात घडली होती. हल्ल्यानंतर संशयित पसार झाल्याने त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना संशयित अहमदाबाद येथे बहिणीकडे पसार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक अहमदाबादकडे निघाले मात्र संशयित तेथून निघून पुन्हा नाशिककडे मित्राला भेटण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या विशेष पथकाने आरोपीला अटक केली. जितेंद्र भागवत खंडारे (खडका, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पूर्व वैमनस्यातून झाला हल्ला
बुधवारी रात्री वैभव डोळे या इसमाने रेतीबाबत विचारणा केल्यानंतर गिरीश तायडे हे चालक आकाश सुरेश सपकाळे (32, खडका मिल समोर, भुसावळ) यांच्यासोबत चारचाकी वाहनाने खडका एमआयडीसीत आल्यानंतर रेती टाकण्याची जागा पाहत असताना संशयित जितेंद्र खंडारे व त्याच्यासोबत तिघे अनोळखी इसम तिथे आल्यानंतर जितेंद्रने आपल्या हातातील धारदार शस्त्राद्वारे तायडे यांच्यावर अचानक हल्ला चढवला होता. आरोपीने मानेवर व पोटावर व कमरेजवळ सपासप वार करीत पळ काढला तर हल्ल्यातील जखमी तायडे यांना वेळीच खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. या प्रकरणी आकाश सपकाळे यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र खंडारेसह चौघांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सिन्नरमधून अखेर आरोपीला अटक
संशयित जितेंद्र खंडारे हा परीवारासह खडका गावातून पसार झाल्यानंतर पथकाने त्याचा नातेवाईकांकडे शोध सुरू केला होता. संशयित हा अहमदाबाद येथे बहिणीकडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथक अहमदाबादच्या दिशेने रविवारी निघाले मात्र संशयित तेथून नाशिकमधील सिन्नर गावातील हॉटेल शाहू येथे मित्राला भेटण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक सिन्नरला पोहोचले. संशयित हॉटेलवर येताच त्यास ताब्यात घेण्यात आले. सोमवारी पहाटे पाच वाजता भुसावळात आणल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली.
यांनी आवळल्या संशयिताच्या मुसक्या
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस हवालदार सुरज पाटील, हवालदार प्रेम सपकाळे, नाईक दीपक जाधव आदींच्या पथकाने संशयिताला सिन्नर येथून अटक केली. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार संजय तायडे, हवालदार विठ्ठल फुसे, एएसआय मोरे, पालवे करीत आहेत.