तरुण भारत लाईव्ह | भुसावळ : तरुणीला पळवून नेल्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोीपने पोलिसांच्या धावत्या वाहनातून उडी घेत पलायन केल्याची घटना मंगळवारी सकाळी 10 वाजता रेल्वे पुलावर घडली. पोलिसांनी अशाही परीस्थितीत संशयिताचा पाठलाग केला मात्र पकडले जावू नये म्हणून संशयिताने रेल्वेच्या 50 फूट उंच पुलावरून उडी घेतल्याने त्याचा पाय मोडला तर मानेला जखम झाली. अत्यवस्थ अवस्थेत संशयित पंकज धनराज ठाकूर (28, साकेगाव, ता.भुसावळ) यास अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितावर पोलिसांच्या निगराणीत जळगावात उपचार सुरू आहेत.
नाशिकमध्ये केली अटक
साकेगावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यानंतर दाखल गुन्ह्यात संशयीतासह अल्पवयीन मुलीला नाशिक येथून मंगळवारी ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी सकाळी अटकेच्या प्रक्रियेपूर्वी संशयीताची ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय चाचणी झाली व परतीच्या प्रवासात संशयीताने वाहनातून उडी घेत पळ काढला. भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, सादीक शेख जगदीश भोई आदींच्या पथकाने संशयित पंकज ठाकूर याचा पाठलाग करीत त्यास पुन्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवले.