भुसावळ गोळीबार प्रकरण : माजी नगरसेवकसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : भुसावळ शहरातील गोळीबारप्रकरणात माजी नगरसेवकसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात असलेल्या मरीमाता मंदिराजवळ दीपक धांडे यांच्या कार्यालयाजवळ बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास चारचाकीने जात असलेल्या माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करीत हल्ला केला होता. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.

मिथुन बारसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार, ३० रोजी माजी नगरसेवक राजू सुर्यवंशीसह शिव पथरोड, विष्णू पथरोड, विनोद चावरिया, सोनू पंडीत, टकरन पथरोड, नितीन पथरोड, बंटी पथरोड यांच्यासह २-३ अनोळखी इसमविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घडलेल्या घटनेनंतर दोघांचे मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. संपूर्ण जिल्हा पोलीस प्रशासन संशयितांच्या शोध घेत होते. दरम्यान, संशयीत आरोपी राजू सूर्यवंशी हा चारचाकी वाहनाने गुजरात जात असताना त्याला साक्री जि.धुळे येथे एका हॉटेलवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच विनोद चावरिया याला देखील ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

मयत माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी ५.३० वाजेच्या सुमारास मृतदेह भुसावळ येथे घेऊन जाण्यात आला.