भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपींना दहा वर्ष शिक्षा व दंड

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय पीडीतेवर सन 2015 मध्ये अत्याचार करण्यात आल्यानंतर त्यातून पीडीता गर्भवती राहिली होती. या प्रकरणी पीडीतेने वरणगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी भुसावळ सत्र न्यायालयात सात वर्ष खटल्याची सुनावणी चालली. भुसावळ सत्र न्यायाधीश आर.एम.जाधव यांनी बुधवार, 9 रोजी खटल्यातील दोन्ही आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी दहा वर्ष शिक्षा व 30 हजारांचा दंड सुनावला.

नात्यातील नराधमानेच केला होता अत्याचार
भुसावळ तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन बालिकेवर फेबु्रवारी ते ऑक्टोबर 2015 या कालावधीत धमकी देवून वारंवार अत्याचार करण्यात आला व त्यातून पीडीता गर्भवती राहिली होती. या प्रकरणी 20 ऑक्टोबर 2015 रोजी वरणगाव पोलिसात आरोपी सुरेश सुकदेव कोळी (53) व समाधान प्रल्हाद पाटील (33, दोन्ही रा.पिंपळगाव खुर्द) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. भुसावळ सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले.

पीडीतेसह आईची साक्ष ठरली महत्त्वाची
या खटल्यात सरकार पक्षाने एकूण 11 साक्षीदार तपासले. त्यात पीडीता, तिची आई व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयाने या खटल्यातील दोन्ही आरोपींना दहा वर्ष कारावासासह प्रत्येकी 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी प्रभावी युक्तीवाद केला.