भुसावळ : भुसावळ खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, रेल्वे न्यायालयाने तिघांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अटकेतील आरोपी करण पथरोड याने इंदौर येथून आणलेली तीन गावठी पिस्टल अकलूद, ता.यावल येथील किरण कोळी (35) या संशयीताकडे ठेवल्याचे तपासात समोर आल्यानंतर या संशयीताला शनिवारी दुपारी अटक करण्यात आली. दुहेरी हत्याकांडातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, संशयीत शिव व करण पथरोड यांनी हत्या करण्याच्या उद्देशाने इंदौर येथून तीन गावठी पिस्टल व सुमारे 30 वर जिवंत काडतूस खरेदी केले व हा शस्त्रसाठा अकलूद, ता.यावल येथील किरण कोळी या संशयीताच्या घरात ठेवला. हत्याकांडाच्या आदल्या दिवशी मंगळवारी संशयीतांनी तीन्ही पिस्टल व जिवंत काडतूस घेवून बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बारसे व राखुंडे यांची निर्घूण हत्या केली तसेच भारत नगरातही गोळ्या झाडून दहशत निर्माण केली. कोळी याच्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. शनिवारी शहर पोलिसांनी किरण कोळी याला आरोपींचे शस्त्र लपवण्यात मदत केल्याप्रकरणी अटक केली. पोलिसांनी आता इंदौर येथील शस्त्र पुरवठादाराचा शोध सुरू केला आहे तर पथरोड टोळीतील अन्य सदस्यांच्या मागावर पोलिसांची चार पथके असल्याचे सूत्रांनी सांगितले.
माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची बुधवारी रात्री 9.30 वाजता जुना सातारा भागातील मरिमाता मंदिरासमोर गोळीबार करीत हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, विनोद चावरिया व करण पथरोड यांना अटक केली होती. संशयीतांना शुक्रवारी रात्री 11 वाजता रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. शहरात तणावाची परिस्थिती पाहता रेल्वे न्यायालयाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून मुख्य गेट बंद करण्यात आले तर रेल्वे न्यायालयात संशयीतांना हजर केल्यानंतर शहर पोलिसांनी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. रेल्वे न्यायालयाने तिघांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास करीत आहे.