भुसावळ : निर्घृण हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा भुसावळ हादरलं आहे. तालुक्यातील गोजोरा येथे २७ वर्षीय तरूणाला अज्ञात कारणावरून शेतात बोलावून बेदम मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना आज शुक्रवार, १६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद गंभीर कोळी (२७, रा. गोजोरा, ता. भुसावळ) असे मृत तरूणाचे नाव आहे.
तालुक्यातील गोजोरा येथे विनोद कोळी हा तरूण आपल्या आई, वडील आणि दोन भावांसह वास्तव्याला होता. शेतीकाम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. विनोदचे वडील गंभीर कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी संशयित जितू प्रभाकर डोळे, समा प्रभाकर डोळे यांनी विनोदला मारहाण केली होती. आज शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी विनोदला एकटाच असल्याचे पाहून त्याला संशयित श्रावण सुपडू डोळे यांच्या मुलाने शेतात बोलावून घेतले.
शेतात संशयित श्रावण डोळे, जितू डोळे, समा डोळे यांच्यासह काही संशयितांनी विनोदला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला सुरूवातीला भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले. त्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासणी अंती मयत घोषित केले.
भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पोलीस अधिकारी अमोल पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी जळगाव रुग्णालयात येत कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.