भुसावळ : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला असून त्यात भुसावळ विभागाला तब्बल 1470.94 कोटींचा निधी मंजूर केला आहे. आतापर्यंतच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत मिळालेला हा निधी तिप्पट असल्याने वेगाने विकासात्मक कामे होण्याची आशा आहेत. विद्यमान कामांच्या पूर्ततेसाठी तसेच नवीन रेल्वे मार्गांचे सर्व्हेक्षणासाठी निधी मंजूर करण्यात आला असून भुसावळ-औरंगाबाद या 160 किलोमीटर अंतराच्या नवीन मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे. ही विभागासह औरंगाबादकरांसाठी मोठी उपलब्धी असून त्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
नवीन लाईन सर्वेक्षणासाठी 8.17 कोटीचा निधी मंजूर
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ईगतपुरी-भुसावळ नवीन 3 री लाईन 308 किलोमीटर सर्वेक्षणासाठी 15 लाख रुपये,
भुसावळ-खंडवा नवीन तिसर्या व चौथ्या 123 किलोमीटर अंतराच्या रेल्वे लाईनसाठी 15 लाख रुपये, औरंगाबाद-भुसावळ नवीन लाईन 160 किमी सर्वेक्षणासाठी 15 लाख. औरंगाबाद-बुलढाणा-खामगाव नवीन लाईन 170 किमी सर्वेक्षणासाठी 25 लाख, भुसावळ-बडनेरा-वर्धा नवीन चौथी लाईन अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी 313 किमीसाठी पाच कोटी 26 लाख रुपये, भुसावळ-खंडवा नवीन तिसरी/ चवथी ओळ अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी 1 कोटी (बांधकामासाठी), मनमाड-जळगाव नवीन चौथ्या लाईनच्या फायनल लोकेशन सर्व्हेसाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
इंदूर-मनमाड रेल्वे लाईनसाठी मिळाला निधी
वर्तमान स्थितीतील नवीन लाईनच्या बांधकामासाठी 523.20 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यात इंदूर-मनमाड 368 किमीसाठी दोन कोटी रुपये, धुळे-नरडाणा 50 किमीसाठी 100 कोटी रुपये, पाचोरा-जामनेर-मलकापूर- 84 किमी 50 कोटी 20 लाख रुपये, भुसावळ-जळगाव तिसरी लाईनीसाठी एक कोटी रुपये, मनमाड-जळगाव थर्ड लाईनीसाठी 160 किमी 350 कोटी रुपये आणि जळगाव-भुसावळ चौथ्या लाईनीसाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
ओव्हर ब्रिज, उड्डाणपूलासाठीही निधी
जळगाव येथील गेट क्रमांक 147 वरील उड्डाणपूलासाठी 10 कोटी 12 लाख रुपये, बडनेरा गेट क्रमांक 7 साठी फ्लायओव्हर 3 कोटीरूपये, नांदुरा गेट क्रमांक 20 वरील उड्डाणपूलासाठी 1 लाख रूपये, खंडवा गेट क्रमांक 162 उड्डाणपूलासाठी 1 कोटी रूपये, देवलाली गेट क्रमांक 90, उड्डाणपूलासाठी 6 कोटी 68 लाख रूपये, चांदूरबाजार गेट 70 उड्डाणपूलासाठी 4 कोटी 6 लाख रूपये, कजगाव गेट 126, उड्डाणपूलासाठी 50 लाख रूपये, रावेर गेट 171, उड्डाणपूलासाठी 8 कोटी 67 लाख रूपये, निंभोरा गेट 169 उड्डाणपूलासाठी 3 कोटी रूपये, भादली गेट 149 उड्डाणपूलासाठी 95 लाख रूपये, अमरावती गेट एस-1, उड्डाणपूलासाठी 2 कोटी 78 लाख रूपये, अमरावती गेट एस-3 उड्डाणपूलासाठी 2 कोटी 77 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे.
प्रथमच मोठ्या प्रमाणावर निधी
अर्थसंकल्पात यंदा गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत भरघोस निधी मिळाला असून त्या माध्यमातून आता विभागातील अनेक विकासकामे होणार आहे. विभागातील 35 रेल्वे स्टेशनचे अद्यायावतीकरणासह पादचारी पूल, नवीन रेल्वे लाईनीळे विभागातील दळण-वळण गतीमान होईल, असे वरीष्ठ वाणिज्य निरीक्षक डॉ.शिवराज मानसपुरे यांनी ‘दैनिक तरुण भारत’शी बोलताना सांगितले.