भुसावळ : शहरातील मॉडर्न रोड, आठवडे बाजार, सराफ बाजार भागात दिवसभर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांसह पादचारी नागरीक त्रस्त झाले आहेत. व्यापार्यांनी आपापल्या दुकानांचे फलक रस्त्यावर आणून ठेवले आहेत तर वाहन धारकांकडून कुठेही वाहने उभी केली जात असल्याने व रस्त्यावर अनेक लोटगाडी चालकांनी खाद्यपदार्थांची दुकान सुरू केल्यामुळे रस्ता अरुंद होवून वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांचा श्वास कोंडला गेला आहे. शहरातील झोपलेल्या पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडीचा तिढा सोडवावा, अशी माफक अपेक्षा सुज्ञ भुसावळवासी व्यक्त करीत आहेत.
दररोजच्या कोंडीला नागरीक वैतागले
शहरातील आठवडे बाजार, मॉडर्न रोड, सराफा बाजार, मरीमाता मंदिर परीसर हे शहरातील सर्वाधिक वर्दळीचे भाग आहेत शिवाय मोठी व्यापारीपेठ याच भागात असल्याने हजारो नागरीक येथे खरेदीसाठी दररोज येतात मात्र मुळातच पार्किंगचे दिवस निश्चित नसल्याने वाहनधारक आपल्या पद्धत्तीने जागा मिळेल तेथे वाहन पार्क करतात शिवाय अनेक लोटगाडी चालकांनी वर्दळीच्या रस्त्यावरच आपला डेरा जमवत व्यवसाय थाटला आहे शिवाय व्यापार्यांनीदेखील आपापल्या दुकानांचे फलक रस्त्यावर आणून ठेवल्याने पायीदेखील नागरीक सायंकाळच्या वेळी चालू शकत नाही अशी स्थिती आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी सर्वाधिक वाहतूक कोंडी या भागात होते. पोलीस प्रशासनाने या भागात नियमित गस्त घालल्यास वाहतूक कोंडीला निश्चित आळा बसेल मात्र तसे होत नसल्याने कोंडीचा तिढा अधिकच वाढत चालला आहे.
जड वाहनांना दिवसा हवी प्रवेश बंदी
शहरात जड वाहनांना दिवसा प्रवेश बंदी केल्यास अनेक प्रश्न सुटणार आहे. माल वाहतूक करणारी वाहने दिवसभर वर्दळीच्या भागत शिरल्यानंतर अधिकच वाहतूक कोंडी होते त्यामुळे जड वाहनांना केवळ रात्री आठ वाजेनंतर या भागात प्रवेश देणे गरजेचे असल्याचे सुज्ञ नागरीकांचे मत आहे. व्यापार्यांनी आपापल्या दुकानांचे फलक दुकानाच्या दर्शनी भागावर लावले असतानाही पुन्हा पत्र्याचे बोर्ड रस्त्यावर आणून ठेवल्याने रस्ता अरुंद होतो त्यातच एखादी चारचाकी या भागातून गेल्यास दुचाकीस्वारांना मोठा मनस्ताप सोसावो लागतो तर पायी चालणार्यांना तर वाटच मिळत नाही. सराफ बाजाराकडे जाणार्या वाहनांचा केवळ एकेरी मार्ग ठेवल्यास व नियमांचे काटेकोर पालन झाल्यास निश्चित वाहतूक कोंडी सुटणार आहे.
पार्किंगचे सम-विषम दिवस ठेवण्याची अपेक्षा
शहरातील आठवडे बाजारासह सराफ बाजार, मॉडर्न रोड, मरीमाता मंदिर परीसरातील वाहतूक कोंडीवर तिढा सोडवण्यासाठी दुकानाबाहेर वाहने पार्क करण्यासाठीचे दिवस ठरवून दिल्यास वाहतूक कोंडीचा तिढा बर्यापैकी सुटू शकतो. नूतन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ही बाब सकारात्मकरीत्या घेवून व्यापार्यांची बैठक घेवून हा तिढा सोडवावा, अशी सुज्ञ भुसावळकरांची अपेक्षा आहे.
पालिका प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
शहरातील वर्दळीच्या सर्वच रस्त्यावर अतिक्रमितांनी पक्के अतिक्रमण करून टपर्या थाटल्या आहेत त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यांवर कोंडीची नेहमीच समस्या निर्माण झाली आहे. पालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी अतिक्रमण हटवण्याची कारवाई केल्यानंतर त्यात सातत्य न ठेवल्याने शहरात अतिक्रमण ‘जैसे थे’ झाले आहे. पालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमणाचा सर्वे करून अतिक्रमणाबाबत धडक मोहिम पोलीस प्रशासनासोबत राबवण्याची अपेक्षा आहे. शहरातील जळगाव रोड, जामनेर रोड, यावल रोड आदी भागात सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे.