भुसावळ : शहरातील उच्चभू्र वसाहत असलेल्या तापी नगर भागातून बंद प्लॅटमधून अवघ्या 15 मिनिटात भामट्यांनी सुमारे एक लाखांचे दागिने लांबवल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी दिड वाजता घडला. काही वेळेनंतर प्लॅटममधील महिला घरी परतल्यानंतर घर उघडे दिसताच तिने घरात डोकावल्यानंतर दोन चोरट्यांनी तिला धक्का देत पळ काढला. दरम्यान, रोकडदेखील चोरीला गेली असून महिलेचा पती गावावरून परतल्यानंतर त्याचा आकडा कळणार आहे.
सिनेस्टाईल घरफोडीने शहरात खळबळ
भुसावळातील तापी नगरातील चोपडे बिल्डींगनजीक शालिन व्हिला या अपार्टमेंटमध्ये सदगुरु पेट्रोल पंपाचे मॅनेजर हरीष किशन मदनानी हे पत्नी रेखा यांच्यासह वास्तव्यास आहेत. हरीष मदनानी हे गुरुवारी अकोला येथे कामानिमित्त गेल्याने पत्नी रेखा या घरी एकट्याच होत्या व दात दुखत असल्याने दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास तापी नगर रीक्षा स्टॉपजवळील श्री डेंटल दवाखान्यात प्लॅटला कुलूप लावून गेल्या. पाळत ठेवून असलेल्या व पॉश कपडे परीधान केलेल्या चार चोरट्यांनी स्वीप्टद्वारे दाखल होत एकाने चारचाकी सुरू ठेवत पहारा दिला तर दुसर्याने शालिन व्हिलातील जिन्यात पहारा दिला तर अन्य दोघांनी प्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश करीत तीन तोळे वजनाच्या व 75 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या, 12 हजार 500 रुपये किंमतीचे पाच ग्रॅमचे टॉप्स व 12 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट असा एक लाखांचा ऐवज लांबवला.
पोलीस अधिकार्यांची धाव
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक गजानन पडघन व पोलिसांनी घटनास्थळी भेट देत नेमका प्रकार जाणून घेतला. या प्रकरणी रेखा मदनानी यांनी शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भर दिवसा घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी या परीसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यात चारचाकीत जाणारे चार चोरटे कैद झाले असून वाहनाच्या नंबरप्लेट आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलीस पथकाने नशिराबाद, फेकरी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज संकलीत केले असून गांधी पुतळा तसेच यावल रोड भागातूनही सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.