जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप आहे. परंतू, याप्रकरणात एकनाथ खडसे यांना गुरुवारी न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, आता त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनादेखील जामीन देत न्यायालयाने दिलासा दिला आहे.
पुण्याच्या भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंड खरेदीमध्ये पदाचा गैरवापर केल्याचा एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यावर आरोप होता. या जमिनीची मूळ किंमत ३२ कोटी रुपये असून पत्नी मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांनी ती फक्त ३ कोटी रुपयांत खरेदी केली असल्याचे सांगण्यात येत होते.
विशेष पीएमएलए न्यायालयाने आता या प्रकरणात मंदाकिनी खडसे यांना दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांना काही अटीदेखील घालण्यात आल्या आहेत. त्यांना विनापरवानगी देश सोडून जाता येणार नाही असेही सांगण्यात आले आहे.