अमळनेर : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी नवीन 2024 वर्षाच्या प्रारंभीच अमळनेरसाठी एक नवीन अनमोल भेट दिलीय. ताडेपुरा तलाव संवर्धनासाठी 5 कोटी 43 लाखांचा भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे तलावाचे भाग्य उजळून भविष्यात हा पिकनिक स्पॉट ठरणार आहे. नगरविकास विभागाकडून अमळनेर नगरपरिषदेसाठी सदर निधी मंजूर झाला असून या निधीतून विविध तलाव विकासाची कामे होणार असल्याने तलावाचे स्वरूप बदलणार आहे.
विकासात्मक कामे अशी
डेटा संकलन, सर्वेक्षण आणि पाण्याचे विश्लेषणसाठी ३ लाख, MBBR च्या सांडपाण्यावर जैविक प्रक्रिया करण्यासाठी २ कोटी, टॉयलेट ब्लॉक (स्त्रिया आणि पुरुष) निर्माण करण्यासाठी ४५ लाख, चेनलिंक, फेन्सिंग व तलाव भोवती भराव व फौंडेशन करणेसाठी ५० लाख, निर्माल्य कलश व मूर्ती इमर्शन टाकी बांधकाम साठी २५ लाख, सांड पाण्यासाठी चेंबर सह गटर बांधणे ३० लाख, पेव्हर ब्लॉक सह वृक्षारोपण, लँडस्केप, उद्यान विकास आणि मार्ग साठी ४५ लाख, सौर यंत्रणे वर विद्युतीकरणसाठी २५ लाख, सौर विसर्जित वायुव्हिजन साठी २५ लाख, बेंच साठी ७.५ लाख, जनजागृतीसाठी ५.० लाख, टॅक्स ८२.८९ लाख अश्या एकूण ५ कोटी ४३ लाख ३९ हजार निधीतून तलावाचे संवर्धन होणार आहे.
दरम्यान चोपडा रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेला ताडेनाला पूर्वी गणपती विसर्जनामुळे प्रकाशझोतात होता. मात्र, काही वर्षांपासून हा नाला पूर्णपणे दुर्लक्षित झाल्याने मोठी दुरावस्था याची झाली आहे. पावसाळ्यात अनेकदा या नाल्याला पूर येत असल्याने आजूबाजूच्या घरात पाणी घुसून नासधूस होत असे, वर्षभर पाणी असलेल्या या तलावाचे संवर्धन झाल्यास निश्चितच हा पिकनिक स्पॉट ठरू शकतो आणि मंगळग्रह मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी देखील हा पर्वणी ठरू शकतो हे दृष्टिकोन मंत्री अनिल पाटील यांनी ठेऊन ताडे तलाव संवर्धनाचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला होता अखेर त्यांच्या प्रयत्नाने शासनाने यास मंजुरी दिल्याने या तलावाचे भव्य उजळले आहे.सदर मंजुरी बद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना अजित पवार,ग्रामविकासमंत्री ना गिरीश महाजन व पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.