मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला; मंत्र्यांच्या घरावर हल्ला

मणिपूर : मणिपूरमधील बिष्णूपूर आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये बुधवारी संध्याकाळी आणखी हिंसाचार झाला. या वेगवेगळ्या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एका राज्यमंत्र्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. या सर्व घटनांमुळे राज्यातील बिष्णुपूर, इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम आणि जिरिबाम जिल्ह्यांमध्ये पुढील आदेशापर्यंत कोणतीही शिथिलता न देता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

मणिपूरमध्ये दोन समुदायांमधील रक्तरंजित हिंसाचार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. राज्यातील हिंसाचार थांबत नसल्याने परिस्थिती बिघडत आहे. भारतीय लष्करासह, इतर केंद्रीय सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस दल मणिपूरमधील परिस्थिती शांत करण्यासाठी सज्ज आहेत. असे असतानाही मैतई आणि कुकी समाजाचे हिंसक आंदोलक शांत बसायला तयार नाहीत. बुधवारी संध्याकाळी, अचानक जमावाने निंगथौखोंग शहरातील राज्यमंत्री गोविंददास कोन्थौजम यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. यावेळी हिंसक आंदोलकांनी मंत्र्यांच्या घरातील फर्निचरसह मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला मणिपूरमध्ये मैतई आणि कुकी समुदायांमधील हिंसक संघर्षात सुमारे ७० लोकांचा मृत्यू झाला आणि २०० हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आणि गोंधळानंतर हजारो लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारात मरण पावलेली व्यक्ती बुधवारी सकाळी थम्नापोकपी पायथ्याशी संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या दोघांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले. या व्यक्तीला इम्फाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.