इंफाळ : मणिपूरमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला हिंसाचार आजही सुरुच आहे. सरकार आणि नागरिकांना तणाव निवळला असे वाटत नाही तोच गोळीबाराच्या घटना घडत आहेत. बुधवारी रात्री मणिपूरच्या खमेनलोक परिसरात मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला आहे. यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १० अन्य नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी इंफाळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
सशस्त्र फुटीरतावाद्यांनी इम्फाळचा पूर्व जिल्हा आणि कांगपोकी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खमेनलोक भागात गावकर्यांवर भ्याड हल्ला केला आहे. पहाटे १ वाजता हा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. या सर्वांना इम्फाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिक्षक शिवकांत सिंह यांनी सांगितलं की, या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांचं शवविच्छेदन करण्यात येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी देखील या भागात गोळीबार झाला होता. यामध्ये दोन्ही बाजुचे नऊजण जखमी झाले होते. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण ११५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चाळीस हजारांपेक्षा अधिक लोक विस्थापीत झाले आहेत.
मणिपूरमधील मैतई आणि कुकी समुदायामध्ये गेल्या मे महिन्यात वाद झाला होता, तेव्हापासून या हिसांचाराला सुरुवात झाली आहे. राज्यातील १६ पैकी ११ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.