नवी दिल्ली : मणिपूरमधील जातीय हिंसाचार आणि नुकत्याच समोर आलेल्या महिलांच्या विवस्त्र धिंड प्रकरणाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात अजूनही अस्वस्थता आहे. याचे पडसाद संसदेतही रोज उमटत आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून विरोधकांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन जोरदार खडागंजी केली आहे. त्यामुळं अनेकदा दोन्ही सभागृहांची कामकाज बंद करावं लागलं होतं. पण आता गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः पत्र लिहून लोकसभेतील विरोधीपक्ष नेते अधिर रंजन चौधरी आणि राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिलं आहे.
काय म्हणाले आहे अमित शहा?
शहा म्हणतात, गेल्या सहा वर्षांपासून मणिपूरमध्ये भाजपचं सरकार आहे. या काळात हे राज्य शांती आणि विकासाच्या नव्या युगाचा अनुभव घेत होतं. पण कोर्टाचे काही निर्णय आणि काही घटना घडल्या ज्यामुळं मे महिन्याच्या सुरुवातीला हिंसाचाराच्या काही घटना घडल्या. काही लाजीरवाण्या घटना देखील समोर आल्या. त्यामुळं संपूर्ण देशातील जनता, ईशान्येकडील जनता विशेषतः मणिपूरची जनता देशाच्या संसदेकडून अपेक्षा व्यक्त करत आहे. सध्याच्या काळात मणिपूरच्या जनतेला ही अपेक्षा आहे की आपण सर्व पक्षाचे खासदारांनी त्यांना हा विश्वास द्यावा की आपण सर्वजण एक होऊन तिथल्या शांतीसाठी संकल्पबद्ध आहोत. यापूर्वी आपल्या संसदेनं हे करुन दाखवलं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आम्ही संसदेत मणिपूरवर केवळ निवदेन करणार नाही तर संपूर्ण चर्चा करण्यासाठी तयार आहोत. त्यामुळं मी आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि सहकाऱ्याची आशा करतो.